सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला; राहुडमध्ये खळबळ, दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल पिंपळगाव राजा


सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला; राहुडमध्ये खळबळ, दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल
पिंपळगाव राजा (ता. खामगाव, जि. बुलढाणा) – राहुड येथे सख्ख्या भावाचा निर्घृण खून करून मृतदेह जाळत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात खुनाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अप क्र. 47/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 238 व 3(5) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी विलास देविदास बनसोडे (वय 40), व्यवसाय शेती व पोलीस पाटील, रा. राहुड यांनी दिलेल्या तोंडी फिर्यादीनुसार, गावातील चेतन संजय इंगळे (वय 35) हे दि. 25 फेब्रुवारी 2026 पासून घरी परतले नव्हते. त्याबाबत संशय निर्माण झाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता आरोपी रोशन संजय इंगळे (वय अंदाजे 36, रा. राहुड) याने चौकशीदरम्यान कबुली दिली की, दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता राहुड येथील शेतात त्याने आरोपी रवि देविदास राऊत (वय अंदाजे 36, रा. महाकाल चौक, खामगाव) यांच्या मदतीने चेतन इंगळे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्यांना ठार मारले. त्यानंतर मृतदेह जाळून त्याची राख नदीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या थरारक घटनेमुळे राहुड परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून अधिक तपशील उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या