बलात्कार प्रकरण दडपण्यासाठी ९ लाखांची ऑफर; नकार दिल्यावर मारहाण, बहिणीला गायब करण्याच्या धमक्या पिंपळगाव राजात संताप उसळला


बलात्कार प्रकरण दडपण्यासाठी ९ लाखांची ऑफर; नकार दिल्यावर मारहाण, बहिणीला गायब करण्याच्या धमक्या पिंपळगाव राजात संताप उसळला

 पिंपळगाव राजा (ता. खामगाव) दि. 17 एप्रिल
पिंपळगाव राजा येथे एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात, बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला वाचवण्यासाठी ९ लाख रुपयांची ऑफर देत दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदाराने यास नकार दिल्यानंतर त्याला मारहाण, शिवीगाळ तसेच जीवे मारण्याच्या आणि बहिणीला गायब करण्याच्या धमक्या देण्यात आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी एनसीआर क्रमांक 0114/2026 पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दि. 17 एप्रिल रोजी रात्री 9.42 वाजता नोंदवण्यात आला आहे. घटना दि. 16 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पेठपुरा परिसरात घडल्याचे नोंदीत नमूद आहे.
तक्रारदार शेख हुजैफ शेख सोहील (वय 20, रा. पेठपुरा, पिंपळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या अल्पवयीन बहिणीवर यापूर्वी रेहान खान याने बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असून तो सध्या कारागृहात आहे.
दरम्यान, या प्रकरणातून आरोपीची सुटका करण्यासाठी मुख्तार खान आहेमद खान, शेख शकील शेख रशीद आणि शेख शाहीद शेख शकील (सर्व रा. पेठपुरा, पिंपळगाव राजा) यांनी तक्रारदाराला बोलावून केस मागे घ्या व आरोपीला निर्दोष करा” असा दबाव टाकला. त्यासाठी सुरुवातीला ९ लाख रुपये देण्याची ऑफर देण्यात आली, तसेच उर्वरित रक्कम आरोपी सुटल्यानंतर देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे.
मात्र तक्रारदाराने स्पष्ट नकार दिल्यानंतर संबंधितांनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली, इतकेच नव्हे तर त्याच्या बहिणीला गायब करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. पुढील दिवशी, दि. 17 एप्रिल रोजीही पुन्हा धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात तक्रारदार व आरोपी हे एकाच गावातील असून परस्पर नातेवाईक असल्याचेही समोर आले आहे, त्यामुळे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे.
पिंपळगाव राजा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 115(2), 351(2) व 352 अन्वये अदखलपात्र (NCR) गुन्हा नोंदवला असून पुढील कारवाईसाठी तक्रारदारास न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 गावात संतापाची लाट
या घटनेमुळे पिंपळगाव राजा परिसरात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या