खामगाव (जि. बुलढाणा) – 23 जुलै 2025 रोजी खामगाव शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. रोहन पैठणकर या बौद्ध दलित तरुणास "तू गाय चोर आहेस" या कारणावरून तीन नराधमांनी सार्वजनिक ठिकाणी निर्वस्त्र करून बेदम मारहाण केली. अत्यंत लज्जास्पद बाब म्हणजे, पीडिताचा धर्म तपासण्यासाठी त्याचे अंतर्वस्त्र काढण्यात आले व अपमानास्पद प्रश्न विचारण्यात आले – "तू कुठल्या धर्माचा आहेस?"
या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी व्हिडिओ घेतल्याचे बोलले जात आहे, मात्र आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. पीडित तरुणावर झालेल्या अत्याचाराची गंभीर दखल घेत शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 227/25 नोंदवून अॅट्रॉसिटी कायदा व भारतीय दंड विधानातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीदेखील आजपर्यंत पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, ही बाब अत्यंत दुर्दैवी व प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित पगारीया, गब्बू गुजरीवाल आणि प्रशांत संगेले हे तिघेही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले असून, विशेषतः गब्बू गुजरीवालवर MPDA अंतर्गत कारवाई झालेली आहे आणि त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तरीही त्यांच्यावर तत्काळ अटकेची कारवाई होत नसल्यामुळे, या आरोपींना राजकीय अथवा स्थानिक पाठींबा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर भीम आर्मी (भारत एकता मिशन) चे जिल्हाध्यक्ष समाजरत्न प्रकाशभाई धुंदळे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदन सादर करून, या तिन्ही आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तडीपार करण्यात यावे व या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या कथित द्वेषमूलक संघटनेवर बंदी घालण्यात यावी, अशी ठाम भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे.
या अमानुष घटनेमुळे दलित समाजात प्रचंड असंतोष आहे. अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहेत. एकविसाव्या शतकात धर्माच्या नावावर अशा प्रकारे अमानुषता घडणे हे भारतीय संविधानाच्या मूल्यांना ठेंगा दाखवणारे आहे.
जय भीम!
– प्रतिनिधी, खामगाव
0 टिप्पण्या