पिंपळगाव राजा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहातपिंपळगाव राजा (प्रतिनिधी)

पिंपळगाव राजा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात

पिंपळगाव राजा (प्रतिनिधी) — पिंपळगाव राजा शहरात दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी वहले हॉल येथे एक प्रेरणादायी व उपयुक्त कार्यक्रम पार पडला. जमाअत-ए-इस्लामी हिंद, पिंपळगाव राजा यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या टॉपर विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच भावी करिअरसाठी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात इस्लामी परंपरेनुसार मुफ्ती आमिरुल्लाह खान यांच्या कुरआन पठणाने झाली. त्यानंतर प्रारंभीचे उद्गार अशफाक सर यांनी काढले व कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन जावेद इक्बाल यांनी काटेकोरपणे पार पाडले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक इंजिनिअर मोहम्मद शकील यांचे व्याख्यान. त्यांनी विद्यार्थ्यांसमोर आधुनिक काळातील विविध शैक्षणिक संधी, उच्च शिक्षणाचे पर्याय, व्यावसायिक कोर्सेस आणि रोजगाराच्या नव्या दिशा याबाबत सविस्तर माहिती दिली. तंत्रज्ञान, विज्ञान, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील वाढत्या संधींचा लाभ घेण्यासाठी सतत शिक्षण व कौशल्यविकास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे पोलीस उपनिरीक्षक बारवे सर आणि मोहम्मद जूलकर शेख चंद होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, मेहनत, वेळेचे महत्त्व आणि सकारात्मक विचारसरणी या गुणांचे जीवनातील महत्त्व पटवून दिले. “यश हे फक्त परीक्षेच्या गुणांवर अवलंबून नसून, चारित्र्य, जबाबदारीची जाणीव आणि योग्य दिशेने घेतलेले प्रयत्न हे तितकेच महत्त्वाचे असतात,” असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
यानंतर दहावी व बारावीतील टॉपर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली. पुरस्कार वितरणावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून शुभेच्छा दिल्या.
शेवटी जमाअत-ए-इस्लामी हिंद, पिंपळगाव राजा चे स्थानिक अध्यक्ष मोहम्मद जियाउल्लाह यांनी सर्व पाहुणे, पालक, नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमाला शहरातील पालक, नागरिक, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या