नांदुरा (प्रतिनिधी) :
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुस्लिम समाजाला उद्देशून “बांग्लादेशी”, “रोहिंग्या”, “देशद्रोही” अशी भाषा वापरून समाजात तिरस्कार आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या घृणास्पद आणि भडकाऊ वक्तव्याचा समाजातील नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. या वक्तव्यामुळे संविधानाच्या मूल्यांचा अपमान झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे.
याच पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज नांदुरा तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. प्रशासनाने पुतळा दहनाची परवानगी अंतिम क्षणी रद्द केली, तरीही कार्यकर्त्यांनी आंदोलन थांबवले नाही. किरीट सोमय्या यांच्या फोटोला चप्पलांनी चोप देत कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. “संविधान जपूया – द्वेषमुक्त भारत घडवूया” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनाचे नेतृत्व समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष श्री आझाद पठाण यांनी केले. मोठ्या संख्येने युवक, पदाधिकारी आणि नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी मा. राज्यपाल महोदयांना तहसीलदारांमार्फत निवेदन सादर केले. या निवेदनात किरीट सोमय्या यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे, तसेच भविष्यात कोणतीही धर्मद्वेषी विधाने खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.
समाजवादी पक्षाच्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र पोलीस प्रशासनाने योग्य वेळी बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली. या निषेध आंदोलनामुळे राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.
0 टिप्पण्या