खामगाव (प्रतिनिधी):
खामगाव तालुक्यातील नांदुरा–खामगाव रोडवरील पिंप्री देशमुख फाट्याजवळील चिखली गावाच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध बायोडिझेल विक्रीविरोधात MDP पक्षाचे विदर्भ अध्यक्ष मोहम्मद हसन इनामदार यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करत प्रशासनाला जागे होण्यासाठी इशारा दिला आहे.
इनामदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, या अवैध बायोडिझेल व्यवसायामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. या पंपाचा मालक नितीन लाहुडकार असून, तो संबंधित अधिकाऱ्यांना दरमहा लाखो रुपयांचे हप्ते देऊन हा बेकायदेशीर व्यवसाय चालवत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत पुढे नमूद आहे की, “गेल्या अनेक वर्षांपासून शासनाची फसवणूक करून चालणाऱ्या या पंपाविरोधात अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी खामगाव यांनी शासनाच्या नुकसानाची वसुली करावी. तसेच पंप मालक नितीन लाहुडकार व त्याच्या कुटुंबीयांच्या अवैध संपत्तीची चौकशी करून ती जप्त करण्यात यावी.”
इनामदार यांनी ३ नोव्हेंबर रोजी प्रतिक्रिया देत स्पष्ट इशारा दिला आहे की,
“जर हा अवैध बायोडिझेल पंप दोन दिवसांत कायमस्वरूपी बंद करण्यात आला नाही, तर मी स्वतः आमरण उपोषणास बसेन!”
पुढे ते म्हणाले की, “या पंपावर नेहमी लाखो लिटर डिझेलचा साठा ठेवला जातो. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास चिखली गावातील शेकडो निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. या संभाव्य जीवितहानीची जबाबदारी प्रशासनावरच राहील.”
इनामदार यांनी पुढे सांगितले की, “पालकमंत्री बुलढाणा यांनी या संदर्भात आधीच कारवाईचे आदेश दिले असतानाही, अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याचे अत्यंत खेदजनक आहे. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे या अवैध व्यवसायाशी संगनमत असल्याचा संशय येतो.”
या तक्रारीची प्रत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा, तसेच उपविभागीय अधिकारी (महसूल) खामगाव यांना सुद्धा पाठविण्यात आली आहे.
इनामदार यांनी शेवटी सांगितले की,
“जर दोन दिवसांत हा अवैध बायोडिझेल पंप कायमस्वरूपी बंद झाला नाही, तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांसह पालकमंत्र्यांना घेराव घालून जाब विचारला जाईल. शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या या पंपाविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून त्याची संपत्ती जप्त केली पाहिजे.”
इनामदार यांनी पुढे असेही नमूद केले आहे की, चिखली गावाजवळील या पंपावर सदैव लाखो लिटर बायोडिझेलचा साठा ठेवला जातो. त्यामुळे येथे कधीही अनुचित घटना घडण्याचा धोका आहे, आणि अशा प्रसंगी गावातील निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येईल.
“शासनाच्या कोट्यवधींच्या नुकसानीची भरपाई पंप मालकासह संबंधित तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडून वसूल करण्यात यावी,” अशी ठाम मागणी इनामदार यांनी केली आहे.
📅 दि. ३ नोव्हेंबर २०२५, स्यामगाव
✍️ प्रतिनिधी – बुलढाणा
0 टिप्पण्या