पिंपळगाव राजा ग्रामपंचायतीत रस्त्याची दयनीय अवस्था: विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात, ग्रामस्थ आक्रमक

पिंपळगाव राजा (ता. खामगाव) – येथील ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक तीनमधून जाणारा महत्त्वाचा रस्ता सध्या अतिशय खराब अवस्थेत असून, या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पीएससी आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद कन्या शाळा, बालवाडी आणि इतर सार्वजनिक सेवा केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी हा रस्ता एकमेव पर्याय आहे, परंतु त्याची अवस्था इतकी वाईट आहे की चिखल, खड्डे आणि साचलेले पाणी यामुळे दररोज अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

बरबगाव, ज्ञानगंगापूर, कालबाई वळती यांसारख्या शेजारील गावांतून येणारे विद्यार्थी पिंपळगावच्या मराठी शाळेत शिक्षणासाठी येतात. मात्र, रस्त्यावरील खड्डे व चिखलामुळे त्यांच्या शैक्षणिक हक्कावर गदा आली आहे. पावसात तर ही परिस्थिती अधिकच बिकट होते. आरोग्य केंद्रात उपचारासाठी जाणाऱ्यांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे रस्ता बनवून देण्याची मागण्या केल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांचा इशारा – रस्ता बनून न दील्या तर आंदोलन छेडू

"आमच्या मुलांचं शिक्षण आणि लोकांचं आरोग्य याचं प्रशासनाला काहीही सोयरसुतक नाही. जर आठवड्याभरात रस्त्याचं काम सुरू केलं नाही, तर आम्ही संपूर्ण गावकऱ्यांसह रस्त्यावर उतरू," असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

– प्रतिनिधी, पिंपळगाव राजा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या