शेतकऱ्यांना मोबदला देऊन अधिग्रहित भूखंडावरच जुमडे कुटुंबाचा ‘विज’ अतिक्रमण; प्रशासन गप्प!

शेतकऱ्यांना मोबदला देऊन अधिग्रहित भूखंडावरच जुमडे कुटुंबाचा ‘विज’ अतिक्रमण; प्रशासन गप्प!

पिंपळगाव राजा (प्रतिनिधी) 
पिंपळगाव राजा ते नांदुरा रस्ता मार्गासाठी सन १९८६-८७ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून मोबदला देण्यात आला होता. याच अधिग्रहित जमिनीत महादेव सुखदेव जुमडे यांच्या गट क्रमांक १६६ मधील ०२८ आर भूखंडाचा समावेश होता. शेतकऱ्यांना मोबदला दिला गेला, मात्र तांत्रिक त्रुटींमुळे जुमडे यांच्या ७/१२ उताऱ्यात सदर भूखंडाची नोंद न झाल्याचे आता समोर आले आहे.

या त्रुटीचा फायदा घेत महादेव सुखदेव जुमडे यांच्या वारसांनी शासकीय भूखंडावर ताबा मिळवला. विशेष म्हणजे जुमडे कुटुंबातील एक व्यक्ती, रविंद्र सुखदेव जुमडे, हे पिंपळगाव राजा येथील वीज वितरण कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शासकीय पदाचा गैरवापर करत त्यांनी भूखंडावर वीज कनेक्शनही मिळवले आणि भूखंडावर शेड स्वरूपात अतिक्रमण उभे केले.

या अतिक्रमणामुळे प्रस्तावित रस्ता कामाला अडथळा निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार नोटिसा देऊनही अवैध अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही. नोटिसांमध्ये स्पष्टपणे नमूद केले होते की, प्रभाकर सुखदेव जुमडे यांनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता भूखंडावर अतिक्रमण केलं असून ७ दिवसात हटवावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र संबंधितांनी प्रशासनाच्या आदेशालाही धाब्यावर बसवले आहे.

विशेष म्हणजे सर्व पुरावे व दस्तऐवज असूनही तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन यांना वारंवार लेखी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

राज्यात एकीकडे अतिक्रमणविरोधी मोहिमा राबवल्या जात असताना पिंपळगाव राजा येथे मात्र शासकीय कर्मचारीच शासकीय भूखंड बळकावत असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. सामान्य नागरिकांचे अतिक्रमण हटवले जाते मात्र अधिकारी व त्यांच्या परिवारांवर कारवाई होत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन दोषींवर शासकीय मालमत्ता बळकावल्याचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे. अन्यथा कायद्याचा वापर केवळ सामान्यांसाठीच का, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या