🚨 नांदुरा पोलिसांची मोठी धडक कारवाई : बंदी असलेला गुटखा आणि वाहनासह २० लाखांचा मुद्देमाल जप्त 🚨नांदुरा (


🚨 नांदुरा पोलिसांची मोठी धडक कारवाई : बंदी असलेला गुटखा आणि वाहनासह २० लाखांचा मुद्देमाल जप्त 🚨

नांदुरा (प्रतिनिधी) :
मा. पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री लोढा (खामगाव) आणि उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुधीर पाटील यांनी जिल्ह्यातील अवैध गुटखा व्यावसायिकांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर नांदुरा पोलिसांनी अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी धडक मोहीम सुरू केली आहे.

याच पार्श्वभूमीवर नुकतेच नवनियुक्त ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव यांनी पदभार स्वीकारताच कारवाईचा सपाटा लावला आहे. दिनांक २८ जून २०२५ रोजी दुपारी गुप्त माहितीच्या आधारे नांदुरा शहरातील जळगाव जामोद रोडवरील पूर्णाई नगर भागातील एका टिन पत्र्याच्या गोडाऊनवर छापा टाकण्यात आला.

तपासणीदरम्यान गोडाऊनमध्ये आणि एक महिंद्रा बुलेरो पिकअप वाहन (क्र. MH48AY3421) यामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला व मानवी आरोग्यास अपायकारक सुगंधित गुटखा साठवून ठेवलेला आढळून आला.

पोलीस पथकाने शासकीय पंच व स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत कारवाई करत एकूण १२,२६,२७७/- रुपये किमतीचा गुटखा आणि अंदाजे ८ लाख किमतीचे वाहन असा एकूण २०,२६,२७७/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी गोडाऊनचा जागा मालक विशाल विनोद जैन आणि पिकअपचा चालक-मालक यांच्याविरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आणखी आरोपींना शोधण्यासाठी तपास प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दीपक सोळंके, एसआय मिलिंद जंजाळ, कैलास सुरडकर, विनायक मानकर, राहुल ससाने, विनोद भोजने, पंकज वावगे, रवी सावळे व सुनील सपकाळ यांनी केली.

अवैध गुटखा व्यवसायिकांविरुद्ध अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे नांदुरा पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईचे स्थानिक स्तरावर जोरदार स्वागत होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या