मेरा बु. (प्रतिनिधी):
त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ महाराज मंदिराजवळ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कव्हरेजसाठी आलेल्या पत्रकार बांधवांवर स्थानिक गावगुंडांनी केलेल्या हल्ल्याने पत्रकार जगतात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यात अनेक पत्रकार गंभीर जखमी झाले असून, हा प्रकार थेट लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हल्ला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने २६ सप्टेंबर रोजी ठाणेदारांमार्फत जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात पत्रकारांवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेला गांभीर्याने घेत संबंधित गुंडांविरुद्ध तातडीने मोका अंतर्गत गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा सल्लागार डी. एन. पंचाळ, जिल्हा कोषाध्यक्ष सचिन खंडारे, ज्येष्ठ कार्यकर्ते अर्जुनदादा गवई, तालुका उपाध्यक्ष समाधान सरकटे, सदस्य बबन सरकटे, जिल्हा सचिव प्रल्हाद देशमुख, सि. राजा तालुका अध्यक्ष गंगाराम उबाळे आदींसह अनेक पत्रकार बांधव या वेळी उपस्थित होते.
पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी पोलिस प्रशासनास इशारा देत सांगितले की, जर दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झाली नाही तर जिल्हाभरात आंदोलन छेडण्यात येईल. पत्रकारांवरील हल्ला कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
0 टिप्पण्या