बुलढाणा, दि. २८ (प्रतिनिधी)
बुलढाणा जिल्ह्यात अवैध बायोडीझेल विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठे धाडसत्र राबवून धडाकेबाज कारवाई केली आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी तब्बल ३ हजार २०० लिटर अवैध बायोडीझेल जप्त करत ५ लाख ८६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या कारवाईनंतर ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून जिल्ह्यातील बेकायदेशीर बायोडीझेल माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
गुप्त माहितीवरून धाडसत्र सुरू
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना चिखली-मलकापूर परिसरात महामार्गालगत अवैधरित्या बायोडीझेल विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलिस अधिकारी इनामदार लोहा यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ कारवाईचे नियोजन केले.
मलकापूर शहर पोलीस हद्दीत धाड
२७ सप्टेंबर रोजी एलसीबीच्या पथकाने मलकापूर शहर पोलिसांच्या हद्दीत धरणगाव शिवारातील हॉटेल पौनी धाब्याशेजारी छापा टाकला. तपासादरम्यान जमिनीत पुरलेल्या लोखंडी टाकीतून तब्बल १२०० लिटर अवैध बायोडीझेल (किंमत – २ लाख ६४ हजार ७०० रुपये) जप्त करण्यात आले. या प्रकरणी सख्यद अब्बूला सम्यद याकुब व शेख इम्रान शेख इस्माईल या दोघांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
दसरखेड MIDC मध्ये दुसरी कारवाई
याच दिवशी दसरखेड येथील एमआयडीसी पोलीस हद्दीत रनथम शिवारातील हॉटेल एकता समोर छापा मारण्यात आला. येथेही जमिनीखाली लपवलेल्या लोखंडी टाकीतून तब्बल २ हजार लिटर अवैध बायोडीझेल मिळून आले. या कारवाईत आणखी पाच जणांना आरोपी करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांचे पुढील तपास कार्य सुरू
अवैध बायोडीझेल विक्रीमुळे महसूल गळतीबरोबरच वाहनधारकांच्या जीवितासही धोका निर्माण होत असल्याने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. पोलिस अधीक्षक तांबे यांच्या आदेशानुसार एलसीबीचे धाडसत्र सुरू राहणार असून जिल्ह्यातील अवैध बायोडीझेल माफियांवर पोलिसांची पकड आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे
0 टिप्पण्या