गटविकास अधिकाऱ्यांकडे घरकुलासाठी निवेदन सादर, सर्वधर्मीय ग्रामस्थांचा न्याय्य हक्कासाठी लढा
खामगाव, दि. ६ ऑक्टोबर (प्रतिनिधी)
खामगाव तालुक्यातील मौजे अंबिकापुर येथील सर्वधर्मीय ग्रामस्थांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी एकमुखाने यल्गार पुकारला आहे. सन 1965 पासून कायमस्वरूपी या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या या ग्रामस्थांना अद्यापपर्यंत नमुना-8 (जमिनीचा अधिकार प्रमाणपत्र) देण्यात आलेला नसल्याने, अनेकांचे घरकुल योजनेतील नाव असूनही ते घरकुलापासून वंचित राहिले आहेत.
या गंभीर प्रश्नावर तोडगा निघावा म्हणून ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, खामगाव यांना निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन 1995 मध्ये चितोडा गावाचे विभाजन होऊन अंबिकापुर हे स्वतंत्र गाव निर्माण झाले, मात्र या गावाचा इतिहास त्यापेक्षाही जुना आहे. 1965 पूर्वीपासूनच या गावातील सर्व जाती-धर्मातील लोक येथे वास्तव्यास असून त्यांच्याकडे त्याचे ठोस पुरावे आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही या भूमीचे कायम रहिवासी आहोत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नमुना-8 प्रमाणपत्र आवश्यक आहे. पण आम्हाला तो मिळत नसल्याने अनेक लाभांपासून आम्हाला वंचित राहावं लागतं.”
या निवेदनाच्या प्रती मा. आ. दिलीपकुमार सानंदा (नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), उपविभागीय अधिकारी, खामगाव, तसेच आकाश वासुदेव इंगळे (अध्यक्ष, अस्तित्व चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य) आणि ग्रामपंचायत सचिव, अंबिकापुर यांना देण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात अंबिकापुर येथील सर्वधर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजुटीचे दर्शन घडविले. “आम्हाला आम्ही राहत असलेल्या जागेचा नमुना-8 देऊन तातडीने घरकुल योजना लागू करावी,” हीच सर्व ग्रामस्थांची एकमुखी मागणी होती.
ग्रामस्थांच्या या एकत्रित लढ्यामुळे प्रशासनाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले असून, अंबिकापुरवासीयांना न्याय मिळावा यासाठी पुढील काही दिवसांत निर्णायक हालचाली होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या