बेस्ट चेंज मेकर ऑफ द इयर” पुरस्काराने सन्मानित – खामगावचे सामाजिक कार्यकर्ते जव्वाद अफज़ल खान


बेस्ट चेंज मेकर ऑफ द इयर” पुरस्काराने सन्मानित – खामगावचे सामाजिक कार्यकर्ते जव्वाद अफज़ल खान 
मानवतेसाठीच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव – हैद्राबाद येथे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या अध्यक्षांच्या हस्ते सन्मान

हैद्राबाद, दि. ३ ऑक्टोबर २०२५ (प्रतिनिधी)
खामगावचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व गाझी फाउंडेशनचे अध्यक्ष जव्वाद अफज़ल खान यांना त्यांच्या समाजाभिमुख कार्य, निःस्वार्थ सेवा आणि मानवतेसाठी केलेल्या योगदानाबद्दल “बेस्ट चेंज मेकर ऑफ द इयर” या राष्ट्रीय दर्जाच्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा मानाचा सन्मान ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे अध्यक्ष हजरत मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी साहब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या गौरवशाली समारंभास देशभरातील अनेक नामवंत धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये मौलाना खालिद रशीद फरंगी महली (चेअरमन, इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया, लखनौ) तसेच आमिर इद्रीसी (अध्यक्ष, असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स) यांचा समावेश होता.

जव्वाद अफज़ल खान यांनी गाझी फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. युवकांमध्ये शिक्षण, रोजगार व सामाजिक जबाबदारीबाबत जागृती निर्माण करण्याचे कार्य त्यांनी गेल्या काही वर्षांत सातत्याने केले आहे. त्यांच्या या निःस्वार्थ कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

समाजातील ऐक्य, मानवता आणि प्रगतीचा संदेश देणाऱ्या जव्वाद अफज़ल खान यांच्या कार्यामुळे खामगाव शहराचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून हा सन्मान नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या