बुलढाण्यात एसीबीची मोठी कारवाई अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात ५० हजारांची लाच मागणारे दोन तलाठी रंगेहात अटक



 बुलढाण्यात एसीबीची मोठी कारवाई 
अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात ५० हजारांची लाच मागणारे दोन तलाठी रंगेहात अटक!
बुलढाणा 
जिल्ह्यातील शेगाव शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) अकोला यांनी ३० सप्टेंबर रोजी थरारक सापळा रचून दोन तलाठ्यांना लाच मागणी व स्वीकृती प्रकरणात रंगेहात पकडले. या दोघांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना प्रशासन व सामान्य जनतेत मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.

तक्रारीमागची हकीकत

मिळालेल्या माहितीनुसार, माटरगाव येथील तलाठी अरुण डाबेराव यांनी तक्रारदाराच्या चुलत भावाची जेसीबी व दोन डंपर अशी तीन वाहने अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी पकडली होती. सदर वाहने तहसील कार्यालयात जप्त करण्याची धमकी देत डाबेराव यांनी ही कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल ५०,००० रुपयांची लाच मागितली. त्यापैकी १९,००० रुपये स्वीकारण्यात आले, तर उर्वरित ३१,००० रुपये दुसऱ्या दिवशी आणण्याची मागणी करण्यात आली.

पहिला प्रयत्न अयशस्वी

तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार ११ सप्टेंबर रोजी एसीबी अकोला कार्यालयात दाखल केली. त्यानुसार १२ सप्टेंबर रोजी पहिला सापळा रचण्यात आला. त्या वेळी डाबेराव यांनी लाच रक्कम कमी करून २०,००० रुपये मागणी केली आणि ती रक्कम दुसरे तलाठी अमोल गीते यांच्याकडे द्यावी असे सांगितले. मात्र कारवाईत काही अडथळे आल्यामुळे पहिला सापळा पूर्णत्वास जाऊ शकला नाही.

अखेर रंगेहात अटक

यानंतर २२ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा प्रयत्न झाला. मात्र, डाबेराव यांना संशय आल्यामुळे त्यांनी लाच स्वीकारण्यास नकार दिला आणि कारवाई अपूर्ण राहिली. परंतु एसीबीचे अधिकारी हार मानले नाहीत. सातत्याने प्रयत्न करत अखेर ३० सप्टेंबर रोजी योग्य वेळ साधून पथकाने अरुण डाबेराव व अमोल गीते या दोन्ही तलाठ्यांना लाच मागणी व स्वीकृती प्रकरणात रंगेहात अटक केली.

वरिष्ठांचे मार्गदर्शन

ही कारवाई एसीबी अमरावती विभागाचे पोलीस अधीक्षक मा. मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे व उपअधीक्षक मिलिंदकुमार अ. बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रवीण वेरूलकर व त्यांच्या पथकाने केली.

जिल्ह्यात खळबळ

तलाठ्यासारख्या महसूल अधिकाऱ्यांवरच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत असल्याने जनतेत नाराजीचे वातावरण असून, प्रशासनातील प्रामाणिक कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या कारवाईनंतर ‘एसीबीकडून अशाच कठोर कारवाया सुरू राहाव्यात’ अशी जनतेत अपेक्षा व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या