बुलढाणा, दि. २ ऑक्टोबर २०२५ (प्रतिनिधी)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळावी, तसेच मागील वर्षीची थकलेली पीकविम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी, अशी ठोस मागणी करण्यात आली. त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा ओला दुष्काळग्रस्त" जाहीर करण्याचाही आग्रह यावेळी करण्यात आला.
आज दसऱ्याच्या सणाच्या दिवशी शासनाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकरी खाऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. या वेळी जिल्हा अध्यक्ष अमोल पाटील यांनी इशारा दिला की, "जर दिवाळीपूर्वी आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर हजारो शेतकऱ्यांना घेऊन आम्ही मंत्री महोदयांच्या घरी दिवाळी साजरी करू."
या आंदोलनावेळी जिल्हा संपर्क प्रमुख योगेश घोंगे, तालुका अध्यक्ष गोपाल जुमळे (नांदूरा), तालुका अध्यक्ष चरणसिंग राजपूत, स्वाभिमानी पक्ष तालुका अध्यक्ष गिरीश चव्हाण, राजेश पाटील, गजानन पाटील, रामदास कीर्तने, भरत बोहरपी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या