जळगाव जामोद, दि. ४ (प्रतिनिधी):
“सुन आमच्या घरी परत पाठवा” या कारणावरून गावातील गुंडांनी पहाटे घरात घुसून कुटुंबावर राडा घातला. लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करत महिलांसह पाच जणांना गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना तालुक्यातील वाडी खुर्द येथे शनिवारी पहाटे घडली.
अनिता अशोक काळे (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची सुन उजाला काळे ही मागील दोन महिन्यांपासून दिनेश शिवदास काळे याच्यासोबत राहत आहे. यावरून सतत वाद होत असून, दिनेश काळे व त्याच्या टोळक्याने ४ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता काळे यांच्या घरावर धाड टाकली.
हातात लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या दिनेश काळे, डिलेर राजबाबू काळे, दुर्गेश दिलीप पवार, नितेश पवार, कन्हैया काळे, उर्मिला काळे यांनी घरात शिरून शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. हल्ल्यात अनिता काळे यांच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्राव झाला. त्यांचा मुलगा नलेश याचा हात सुजला, निलसा भोसले व किरीस भोसले यांच्या डोक्याला गंभीर मार लागला, बिरजू पवार, सपना पवार, सत्ताबाई भोसले यांनाही चापटा व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण झाली.
दरम्यान, शेजारी राणी पवार व काजल काळे यांनी मध्ये पडून हल्लेखोरांना हुसकावले. पण जाताना आरोपींनी “पुन्हा आमच्या आड आलात तर संपवून टाकू” अशी थेट जीव मारण्याची धमकी दिली.
जखमींना ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमींना खामगावच्या सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.
या घटनेवरून पोलिसांनी दिनेश शिवदास काळे व इतर आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 189(1)(2), 190, 191(1)(2), 351(2), 352 अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
0 टिप्पण्या