बुलढाणा, दि. १३ एप्रिल २०२६ (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच आपल्या कार्यशैलीतून लोकाभिमुख व संवेदनशील प्रशासनाचा आदर्श निर्माण करणारे डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचा आज अपंग जनतादल सामाजिक संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.
संघटनेचे राज्य सचिव कलीम शेख व दिव्यांग बांधव जिल्हाधिकारी कार्यालयात भेटीस गेले असता, डॉ. देवरे यांनी त्यांना CCTV वर पाहताच तात्काळ दालनात बोलावले. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतः पुढे येत दिव्यांग बांधवांना सन्मानाने बसण्याचा आग्रह केला. “आपल्याला सन्मान मिळणे अत्यावश्यक आहे,” असे सांगत त्यांनी मानवतेचा उत्कृष्ट आदर्श दाखवला.
यावेळी उपस्थित दिव्यांग बांधवांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. फोटोमध्ये दिसून येते की, जिल्हाधिकारी स्वतः पुढे येऊन दिव्यांग बांधवांचा सन्मान करत आहेत, ज्यामुळे उपस्थितांमध्ये समाधान आणि आदराची भावना निर्माण झाली.
चर्चेदरम्यान डॉ. देवरे यांनी कलीम शेख यांना स्वतःचा संपर्क क्रमांक देत सांगितले की, “दिव्यांगांच्या कोणत्याही समस्येसाठी तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधा. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”
या घटनेमुळे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास अधिक दृढ झाला असून, संवेदनशील नेतृत्वाची नवी ओळख निर्माण झाली आहे.
 मानवतेचा स्पर्श असलेले प्रशासन  बुलढाण्यात नवा आदर्श!